पुण्यातील काश्मिरी तरुणांना धमक्या   

पुणे : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर केंद्र सरकारने देशभरात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २८ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याच दरम्यान पुण्यात राहणार्‍या जम्मू काश्मीर येथील तरुणांना समाज माध्यमावर धमक्या दिल्याची घटना घडली आहे. त्याबाबत काही तरुणांनी एकत्रित येत पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
 
यावेळी काश्मिरी तरुण आकिब भट म्हणाले, पहलगाममध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये सगळ्यात जास्त दुःख आम्हाला झाले आहे. हा हल्ला झाल्यानंतर स्थानिक काश्मिरी लोकांवर डाग लावला जात आहे. हे चुकीचे असून पहलगाममध्ये हल्ल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी सर्व पर्यटकांना घरामध्ये राहण्यास जागा दिली. तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करित निषेध नोंदविला. त्यानंतर छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्ये काश्मीर येथील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पुण्यासह अन्य भागात राहणार्‍या काश्मिरी तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता जे विद्यार्थी काश्मिरीमध्ये गेले आहेत. ते पुन्हा काश्मीर सोडून येण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. मी २० वर्षापासून पुण्यात राहतोय, इथेच लहानाचा मोठा झालो. मला येथील नागरिकांनी वेळोवेळी साथ दिली आहे. पण पहलगाम येथील घटनेनेनंतर मला इंस्टाग्रामवर धमकीचे मेसेज आले असल्याचे यावेळी भट यांनी सांगितले.

Related Articles